सकाळी सकाळी 8 वाजता शिवम् च्या हाकेने जाग आली.अगदी डोळे चोळत,वाईट चेहरा करून उठलो.याला लवकर उठायची सवय लागली कधी असा विचार करतानाच, नवीन कॉलेज मधे असल्याची जाणीव झाली.
                  पांघरूण कडेला सारलं (ते व्यवस्थित घडी घालून ठेवण्याची सवय तर आजही नाही) आणि मरगळ झटकून वसतिगृहाच्या व्हरांड्यात आलो.दुसऱ्या मजल्यावरून सगळं कसं अगदी मस्त वाटत होतं.मुक्त!!.समोर मुलींंच्या वसतिगृहाच्या पटांगणात लावलेली झाडे,अगदी बगिच्यासारखी केलेली एकूणच सजावट दिसत होती ,लांबवर सांगली-मिरज रोड वरील वाहने वेगात धावताना दिसत होती.आजपासून आयुष्यात काहीतरी नवीन चालू होणार या कल्पनेनंच बरं वाटत होतं.
                  राउटर बघून वायफाय कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला.पण फर्स्ट इयर होस्टेल राउटर अजून बंदच होते.मुलांची सकाळची आन्हिके उरकायची धावपळ दिसली आणि मी भानावर आलो.
                अंघोळीला गरम पाण्यासाठी असणारे बॉयलर बघून फार बरं वाटलं, नाहीतरी पुर्ण सुट्टीमधे "आई एकाच बादलीत कसं ग अंघोळ करायची ?" असं म्हणून माझ्यासाठी हीटर लावून पाणी तापावण्यातच आईची रोजची सकाळ बऱ्यापैकी घालवली होती मी. अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतानाच पुणे आठवलं,अळूच्या पानावरुन जाताना त्यांना ओलं न करता पाणी क्षणार्धात नााहीसं होतं;तशा सर्व आठवणी स्मृतीपाटलासमोरून क्षणार्धात सरकल्या , मनाला ओल्या मात्र करून गेल्या... 
               "आता झालं गेलं विसरून जायचं, IIT चा नाद सोडायचा,जे मिळालंय ते मन भरून जगायचं "हे पक्क ठरवलं.पण आपण मन भरून पाहिलेल्या स्वप्नांना आपण सोडलं तरी ती स्वप्नं आपल्याला सोडत नाहीत हे जरा उशिरा कळालं मला.
              रूमवर आलो.पटापट उरकलं.युगंधर वाचत बेडवर बसलेलो असतानाच आवाज आला,
"झाडू आहे का ?" 
समोर थोडा गोरागोमटा,उंच ,सडपातळ,चेहऱ्यावरून तरी बऱ्यापैकी शांत वाटणारा, हसतमुख मुलगा उभा होता,
"हो, आहे ना.." मी. स्वच्छतेची फार सवयच नसल्याने (आठवी पासून घराबाहेर पडून वसतिगृहात राहण्याचे परिणाम, दुसरं काय ?)
अजून प्लास्टिकच्याच आवरणात असणारा झाडू मी त्याला दिला.
"ब्रँच ?" हातात झाडू देताना विचारलं मी .
चेहरामागची तत्सम हुशारी जोखणे नाव विचारण्यापेक्षा महत्वाची वाटली मला त्यावेळी.
" मेकॅनिकल "तो. ("हुुश्श, भेटलं कोणतरी आपलं" मी माझ्याच मनात)
" मी पण... सव्वादहाला लेक्चर ना ? "मी
" हो."
" नाव काय तुझं ?"  आत्ता हे विचारायचं आठवलं मला.
" चंद्रशेखर... तुझं ?"
" शुभम."
तो घाईत निघूनही गेला.
               दहा वाजले.सॅक मधे एक वही-पेन आणि युगंधर टाकुन,सॅक पाठीला अडकवली आणि रूम सोडली.जातानाच द्वितीय वर्षाचं  वसतिगृह लागलं. अजून वायफाय साठीचा पासवर्ड आणि आयडी मिळाला नसला तरी , वसतिगृहातील ओळखीच्या टेक्नीकल बुद्धिवाद्यांनी कुटाणे करून WCE असा तात्पुरता चालणारा पासवर्ड आणि आयडी शोधून काढला होता.वायफाय कनेक्ट केलं, फेसबुक उघडलं, सुरुवातीलाच एका  मित्राची 'started studying mechanical engineering at IIT Madras 'अशी पोस्ट वाचली,थोड्या खिन्न मनानेच फेसबुक बंद केलं, अकरावी-बारावीतली चूक पुन्हा करायची नाही असं मनोमन ठरवून मी माझ्या निश्चयी पावलांंनी लेक्चरला जाण्यासाठी  वसतिगृह सोडलं ....

Comments

Popular posts from this blog

आमचे सर....