पै पाव्हणे
संध्याकाळचे साडेपाच झाले.कॉलेजमधून रूमवर आलो.बॅग खुर्चीत टाकली.
सकाळपासून चार तास लेेेक्चर्स आणि दोन तासांचं अनाकलनीय व अद्भुत असं thermodynamics च प्रॅक्टिकल सहन केल्यामुळे अथक परिश्रम केल्याच्या अविर्भावात बेड वर पाठ टेकवली. दुपारी कॉलेजनंतर मिळणाऱ्या त्या राजेशाही झोपेचा आनंद काय वर्णावा !!एखादा झोपेबद्दल अरसिक असणारा विद्यार्थीच त्या आनंदास मुुकत असावा.(मुळात असा विद्यार्थी कोणी नसेलच, आणि असलाच तरी तो इंजिनीरिंगचा विद्यार्थी असेल काय हा खचितच वादाचा मुद्दा होईल.)
जग जिंकल्याच्या अविर्भावात डोळे मिटले, तोच;.....बऱ्याचदा आपल्या झोपेचं खोबरं करणारं, खिशात मावनारं , तासाला वर्गातच नेमकं वाजणारं, कंटाळवाण्या लेक्चरला हळूच बाहेर काढलं तरी शिक्षकांना लगेचं दिसणारं ते छोटंसं मोबाईल नामक उपकरण जिवाच्या आकांताने वाजलं .
झोपेचं भरीत झालं.चेहरा अत्यंत वाईट करून मी फोन उचलला.
"हॅलो.."
"हलो...शुभमच नव्हं? आरं कसा हाईस? काय म्हणतूस? किती दिसांनी बोलालूया..कुटं भेटालायंस"
पाकिस्तानवर भारतानं surgical strike का काय केलं, ते हेच असावं बहुतेक असं वाटलं मला त्यावेळी. या सर्व प्रश्नांवर मी एकच प्रतिप्रश्न केला,
"कोण बोलतंय ?.."
"आरं शुभम..,(अरेरे शुभम कसं ओळखलं नाहीस मला,असं म्हणायचं असावं बहुधा त्यांना) सूरज दादा बोलालूय मी. काल काकूंनी सांगितलं नव्हं का तुला ?"
मला कळेचना हे कोण बोलतंय आणि त्यात एकतर वालचंदला आल्यापासून ,एक वडिल सोडले तर इतक्या आपुलकीनं चौकशी करणारा हा पहिलाच पुरुष असावा.
"काकू कोण?.."अजूनही संभ्रमात असणारा मी.
"आरं आई तुझी.."पलीकडून उत्तर आले.
झोपेत बुद्धीला तसाच जोर दिला आणि करंट लागला. सकाळी घाईघाईत पावणेआठला उठून आठच्या अगदी वेळेवर चालू होणााऱ्या MOM च्या लेक्चर ला जाताना आईने कॉल वर सांगितलं होतं आणि 'कोणीतरी येणार आहे बाबांचे महत्वाचे डॉक्यूमेंट्स घेऊन' इतकंच आकलन त्या गडबडीत झालं होतं मला.
"हो हो..आठवलं.. कुठे आहात तुम्ही ?"
"मी स्टँडवरच हाई..वालचंदलाच हाईस नव्हं.थांब कालेजलाच आलो तुझ्या."
फोन ठेवलाच त्यांनी.
झालं...झोप उडलीच होती.आता सायकल वर टांग टाकून पेडल मारत कॉलेज गाठायला हवं होतं. पर्याय नव्हता, ते म्हणतात ना आलिया भोगासी !!!..(ती भटांची आलिया नव्हें..म्हण आहे ही मराठी..विषयांतर सोडून द्या.)
पण याला मला भेटून डॉक्युुुमेेंट्सच द्यायचे होते,तर रूमवरच यायचं ना.सर्वांना कॉलेज चा कॅम्पसच का बघायला हवा असतो काय माहित !! आणि कॅम्पसच बघायला येतात का अजून काही देव जाणे..( तरी हे इंजिनीरिंग कॉलेज आहे ,मेडिकल नाही ) बऱ्याचदा त्यांना माझी रेंज पण चेक करायची असते कारण आज्जीने सांगून पाठवलेलं असतं ' पोरगं काय करतंय बघ बाबा व्यवस्थित, नाहीतर येताना त्या पदवी बरोबर नातसून पण घेऊन यायचं ' त्यामुळे काही असलंच याचं तर कॉलेजलाच दिसंल, असा विचार असावा यांचा...
मी फ्रंट गेट ला पोहोचलो. पार्किंग मधे सायकल लावली. आता हा महात्मा लगेच येणार नव्हताच. म्हटलं Lipton ला जरा कॉफी पिऊन येऊया..
चहा सोडून कॉफी प्यायला लागला की मुलगा व्यवस्थित कॉलेज ला गेला असं असतं म्हणे, असं गावाकडचे काही महान मित्रमंडळी म्हणतात.पण कितीही दमलेलो असलो तरी Lipton कॉफी फ्रेश करतेच.
कॉफी पितानाच मोबाईल वाजला(as usual... ऐनवेळी वाजण्याची सवयच आहे त्याला)
"हॅलो..."
" हा शुभम,तुमच्या म्होरल्या गेट समोरच उभा हाई बग.."
"हो आलोच मी.."
एका दमात राहिलेली सगळी कॉफी रिचवूूून मी पळतच फ्रंंट गेट ला गेेलो.एक रिकामी थांबलेली रिक्षा सोडली तर चिटपाखरू नव्हतं तिथंं.
मी परत कॉल केला.
"अरे दादा कुठे आहेस?.."
" आरं कालेजच्या गेेेट समुरच हाय नव्हंं मी."
"दादा दिसेनास मला तु...समोर कुठे काही लिहिलंय का तिथे सांग की जरा"
"क-स्तू-र-बा-ई वा-ल-चं-द...."
"बास बास कळालं..."
हि स्वारी Walchand College of Engineering सोडून Smt.Kasturbai Walchand College ला पोहोचली होती..डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकायला लागले माझ्या..
मला आता अजून एक कॉफी हवी होती..
"अरे दादा ते कस्तुरबाई वालचंद नव्हे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अस नाव आहे कॉलेज च.."
"आररर..ह्यो तर घोळच झाला म्हणायचा....लांब आहे का रं कालेज तुज.."
तरी ताडमडणार आहेसच की.
" नाही नाही, जवळच आहे.तुझ्या रिक्षावाल्या काकांना सांग की,..."
"कोण रिक्षावाले काका ? आर गाडी आहे माझ्याकडं .."
"ऑ.."
"मित्र आलता स्टँड वर ,त्याचीच घेतलीये..फिर म्हटला सांगलीत."
जीवाची मुंबई करतात तशी ,जीवाची सांगली पण करत असावेत..
"बरं बरं..हे बघ आता कॉलेज कॉर्नर पासून सरळ सांगली-मिरज रोड वर ये..डाव्या रस्त्याने एका तलावाकडून सरळ पुष्पराज चौकात येशील.."
"तिथंन सरळ मिरजेलाच यायचं नव्हं.."
तसाच पुढं कृपामाई ला ऍडमिट झालास तरी चालेल असं ओठांवर येत अगदी.
" अरे ऐकून तर घे..."
" हा सांग की.."
" तिथं कर्मवीरांचा पुतळा लागेल.."
"घोड्यावर बसलेल्या ?"
त्यांना तुझ्या पप्पांनी घोड्यावर बसवलं होतं का रे बाळ्या...
"उभेच आहेत ते...,ऐक मग सरळ त्याच रोड ने मिरजेकडे यायचं..उजव्या हाताला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अशी पाटी दिसेल इंग्लिश मधे"
याला येत ना वाचता..देेेव जाणे..
"आलं ना लक्षात ? नाही कळालं तर विचार कोणालाही गाडी थांबवून..."
" लय लाम्बय "
लांब तू आहेस लेका, मी इथंच राहतोय दीड वर्षांपासून.
"काही वाटलं तरी कॉल कर.."
"हा..ठिवतो.."
आता याची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं..पुन्हा एक कॉफीचा कप घेतलाच...
बऱ्याचदा Lipton च्या त्या बाकांवर शांत बसून इकडं तिकडं बघण्यात बरंच बर वाटतं...सुज्ञास अधिक सांगणे न लगे..
कॉल आलाच..
" हा दादा आलास का ?.."
" शुभम..आरं आपला एक दोस्त भेटला हिथच विश्रामबागात, हिथच थांबलूया.."
'बरं झालं आता तिथंच जाऊन तेवढे डॉक्यूमेंट्स घेऊया, म्हणजे ही ब्याद कॉलेज ला नाही येणार' असा विचार करून मी सायकल पळवतच विश्रामबाग चौकात पोहोचलो..
"हा दादा..शुभम बोलतोय कुठे आहेस.."
" कालीज मधे.."
"ऑ.. तिकडं कधी गेलास..आत्ता मित्राबरोबर होतास ना.."
"झालं की त्ये..त्यानच सांगितलं इकडं कसं यायचं ते.."
कप्पाळ माझं..छान
"आता थांब तिथंच आलोच मी..."
" हा इथं टपरीवर च्या पितु.. ये तवर.."
आमचं Lipton, याची टपरी झाली होती..
विठ्ठला हेच बघायचं राहिलेलं रे आयुष्यात अस म्हणत मी सायकल वर टांग मारली.Lipton जवळ पोहोचलो..आता दादाला ओळखायचं कसं?
" हॅलो दादा..कुठे आहेस.."
" आरं हिथच हाये की.."
"इथं कुठं ?बरं बघतो "
आता lipton जवळ मोबाईलवर बोलणारा प्रत्येक मुलगा माझ्या त्याच्यावरील कुतूहलाच्या नजरेमुळे, मी पाकीटमार वगैरे आहे का काय, म्हणून माझ्याकडे संशयाने पाहतोय असं वाटायला लागलं मला..
" अरे कुठे आहेस दादा ?"
आता माझा जीव अगदीच मेटाकुटीला आला होता.
" आता सांगू काय...तुमची पृथवी हाय नव्हं तिथंच हाय मी.."
"ओके ग्लोब जवळ आलोच थांब.."
मी पळतच गेलो..डोळ्याला फॅन्सी गॉगल,टी शर्ट ,जीन्स पॅन्ट आणि हातात प्लॅस्टीकची बॅग...
आज माझ्या जिंदगीच्या पिपाण्या करणारी हीच ती आसामी...
" अरे दादा..आलास.."
" आरं घावलास की, कुटं हुतास, हरवलता का काय..आं आं.."
" नाही इथंच होतो.."
" मग काय म्हणतय कालेज...?"
जिंदग्या झंड झालेत काय सांगू...
" काही नाही..चाललाय अभ्यास.."
" खरं का.. अजून आँ आँ ??...
आता हा माझी रेंज चेक करत होता..
"हो तर अजून काय असणार..उगाच काहीतरी "
"आरं मी कुटं काय म्हटलं,मी आपलं असंच ईचारलं.."
हे म्हणजे तो मी नव्हेच...
"हो हो.."
मीही अवघडलेली स्माईल दिली.
आणि याचं मात्र त्या गॉगल मधून निरीक्षण चाललं होतं आजूबाजूचं...
" निघुया दादा ?.."
" हा आरं इथं अजून कायतरं छान बांधला असता की.."
बांधतो आता तुझ्या नावानं चंदा गोळा करून सकाळपर्यंत..
चल जरा बघूया म्हणत मला घेऊन जवळ जवळ सगळा कॅम्पस पालथा घातला साहेबांनी...
मी डॉक्यूमेंट्स घेतले..
ते द्यायला आल्याबद्दल त्याचे आभार मानले..
"चल भेटु परत..."
"हा काही लागलं तरी सांग ,म्या येईन "
" हो हो..अगदी.."
दादानं गाडीला किक मारली...
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतानाच, आता अशा पाहुण्यांची आणि कॉलेजची अज्जिबात गाठ घालायची नाही हे मी अगदी मनोमन ठरवलं...
Comments