आमचे सर....

"हजार दिवस कसून अभ्यास करण्यापेक्षा आदर्श शिक्षकासोबत एक दिवस घालवणे अधिक श्रेयस्कर आहे ."
           -जपानी सुभाषित .

                     वालचंद मधे मेकॅनिकल इंजिनिरिंगला प्रवेश घेतला आणि खरं सांगायचं तर प्रथम वर्षीच काही खास शिक्षक आणि त्यांचं खास शिकवणं पाहून आपल्या आयुष्यातील उत्तम ज्ञानार्जनाचा सुवर्णकाळ आता लोपला कि काय याची मला दाट शंका येऊ लागली. मात्र बऱ्याच गोष्टींची सुतराम शक्यताही वाटत नसताना त्या अचानक खऱ्या करून धक्के देण्याचं सामर्थ्य वालचंदच्या हवेत आहे हे नक्की... 
                  शिक्षकांच्या शिकविण्याच्या विविध पद्धतीआणि विभिन्न स्वभाव इतर महाविद्यालयांसारखे इथेही पाहायला मिळतात पण अगदी त्यातही मला इथे जास्तच विविधता आढळली. त्या अर्थानं वालचंदचं शिक्षण हे बहुरंगी आहे. इथं दुसऱ्या शिक्षकांचं लेक्चर घेऊन अवचित ISE घेणारे,चालू रुटीन अकॅडेमिक्स मधे बऱ्याचदा रेग्युलर लेक्चर न घेता वीकएंडला जादा लेक्चर घेणारे शिक्षक आहेत. इथं रोज प्रेझेंटी घेणाऱ्या शिक्षकांच्या
लेक्चरनासुद्धा अगदी रोज दांंडी मारून नंतर प्रेझेंटी वाढवण्यासाठी वगैरे धावपळ करणारी मुले दिसतील तुम्हाला... इतकंच काय,पण छान शिकवतात म्हणून प्रेझेंटी न घेणाऱ्या शिक्षकांच्या लेक्चरना कदाचित क्लासरुम अगदी पूर्ण भरलेली बघायला मिळेल इथे ...
                  स्वता:चा विषय शिकवत अलगद दुसऱ्या विषयांना स्पर्श करणारे शिक्षक इथे आहेत,तर फक्त दुसऱ्याच विषयांना स्पर्श करत आपला विषय अगदी सोडणारेही आहेत.(सुज्ञास अधिक सांगणे न लगे आणि विषयांतर भयास्तव अधिक विस्तार टाळणेच बरे.)
                  एके दिवशी दुपारी इंजिनिरिंग  फिझिक्सच्या तासानंतर MESA-MESC या टेक्निकल क्लबच्या येऊ घातलेल्या VERTEX या इव्हेंट बद्दल माहिती सांगण्यासाठी सिनिअर मंडळी आली होती. त्या इव्हेंट मधल्या  TREBUCHET या सब -इव्हेंट ने माझं लक्ष वेधलं. यामधे एक CATAPULT बनवून त्याद्वारे बॉल फेकून दिलेल्या विविध अंतरांवरचे टार्गेट्स टिपायचे होते. मला अगदी भारीच वाटलं ते त्यावेळी...कारण; आधीच इंजिनिरिंगला आलोय म्हणजे इथं काहीतरी बनवायला  वगैरे मिळणार अशी जरा क्रेझ माझ्या मनात होतीच त्यात ते प्रोजेक्टाईल संबंधित वगैरे असणार हे लक्षात आल्यावर (अकरावी -बारावी फिजिक्सच्या  संबंधाने )जरा अजूनच छान वाटलं. त्यात भाग घ्यायचा दृष्टिकोनही अगदी 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली' असा होता त्यामुळे काहीच नाही झालं तरी काहीतरी शिकायला तरी मिळेल या उद्देशानं नावं नोंदवलं.
                  मग त्याच उत्कंठेत ,मी मिळेल ती माहिती गोळा करून एका कागदावर जमेल तसं साधं डिझाईन बनवलं.कार्पेंटरी शॉप जवळ असणाऱ्या स्क्रॅप मधून लाकडे वगैरे गोळा करून,तिथेच वर्कशॉप मधे VERTEX साठी काम करणाऱ्या मुलांकडून टूल्स वगैरे घेऊन तो लाकडाचा CATAPULT बनवायची माझी छोटीशी मोहीम चालू झाली. नेल्स,इलॅस्टिक टाय वायर,नट-बोल्ट वगैरे आणले. निलेश बरोबर होताच. अगदी त्या उत्साहातच  ५-६ दिवसांमधे CATAPULT तयारही झाला. एक टेनिस बॉल घेऊन मग ट्रायल्स चालू झाल्या. आमचा बॉल काही जास्त अंतर कापू शकत नव्हता. त्याची रेंज कशी वाढवता येईल यावर विचार चालू झाला,पण अनेक प्रयोग  करूनही  ते काही आम्हाला साध्य होत नव्हतं. 'प्रयोग हा प्रतिभेचा प्राणवायू आहे 'असे वाक्य पु.लं.नी सखाराम गटणेच्या तोंडी घातलं आहे पण तो करता करता आमचे प्राण मात्र कंठाशी आले होते. 
                         एक दिवस संध्याकाळी असंच काम चालू असताना वर्कशॉप मधे अचानक गोंधळ चालू झाला. सगळे इव्हेंट हेड,व्हॉलंटिअर यांची धावपळ सुरु झाली. नेमकं काय झालंय म्हणून अगदी एका सिनिअरला विचारले. "अरे सर येतायेत!!" इतकंच उत्तर मिळालं मला. आता हे कोण सर आहेत हे काही मला माहित नव्हतं.  थोडाच वेळ गेला असावा इतक्यात मुलांच्या गराड्यात वर्कशॉप मधे ते सर आले.
                       साधी काळी पॅन्ट,टी -शर्ट,डोळ्यांना फ्रेमलेस चष्मा,पायात चप्पल आणि चेहऱ्यावर गंभीर-मिश्रित-मिश्किल असे भाव ;अगदी साधं व्यक्तिमत्व वाटत होत. मुलांचं म्हणणं ऐकत असताना त्यावर विचार करत मधून मान डोलावणे आणि हातवारे करून काहीतरी समजावणे असं सरांचं चाललं  होतं. सरांसमोर वर्गात नसतानाही एक इव्हेंट प्लँनिंग म्हणून कोणत्यातरी सरांजवळ इतकी मुले मी तरी पहिल्यांदाच पाहत होतो. बघता बघता सर आमच्यापर्यंत आले.
"अरे... फर्स्ट इयरची मुले पण आहेत का ?!... छान छान !"इतकी प्रतिक्रिया मिळाली. सर तिथून पुढे गेले.    तेवढ्यात निलेशने मला विचारलं "आपण हा रेंजचा प्रॉब्लेम सरांना सांगूया का ?"
"हो,विचारून तरी पाहूया.काहीतरी कळेलच."मी म्हणालो.
                        सर जरा मोकळे आहेत असा क्षण साधून मी त्यांच्या कडे गेलो. आमचा प्रॉब्लेम सांगितला. ते CATAPULT जवळ आले.थोडं निरीक्षण करून त्यांनी  प्रश्नांची सरबत्ती केली
"हे मेकॅनिझम का निवडलंस ?आर्मला लावलेले बोल्ट गरजेपेक्षा जास्त मोठे आहेत का ?,आर्मसाठी वापरणाऱ्या लाकडामधे काही प्रॉब्लेम वाटत नाही का ?बरं रेंज कशी वाढवणार आहेस ?"
मी आपलं आर्म ताणण्यासाठी लावलेल्या इलॅस्टिक वायरचं  स्प्रिंगच्या अनुषंगाने अकरावी -बारावीत शिकलेलं स्टिफनेस संबंधीत ज्ञान पाजळलं.पॅरलल मध्ये लावून स्टिफनेस वाढवू वगैरे सांगितलं.
"बरं.. प्रयत्न करून सांग"हे उत्तर मिळालं. सर लगेच पुढे गेलेही. मी मात्र आश्चर्यचकित झालो. 'हे काय ?एकतर काही सोल्युशन पण सांगितलं नाही आणि उगाच अजूनच प्रश्न पाडून गेले.' मला जरा रागच आला. पण सर विद्यार्थ्यांचं  काम आणि  व्यवस्थित प्रयत्न वगैरे पाहिल्याशिवाय त्यांना लगेच मदत करत नाहीत, हे मला तेंव्हा काही माहित नव्हतं.आम्ही आपलं सरळच सोल्युशन विचारलं होतं आणि मग त्यांनीही प्रयत्न करायला सांगितलं.
                        खरंतर त्या CATAPULT मधे बरेच प्रॉब्लेम होते. एकतर आर्मचं लाकूड स्क्रॅप मधलं असल्यामुळे काही फार चांगलं नव्हतं. त्यात त्यावर मोठे होल पडून नट-बोल्ट लावल्यामुळे त्या विशिष्ट भागात स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं होतं.मुळात मेकॅनिझम मध्येही थोडी चूक होतीच. आर्म ताणल्यावर तो पुढे जाऊन फ्रेमवर आपटल्यावर मगच  बॉल फेकला जात होता. त्यामुळे ताणलेल्या आर्मची  निम्मी-अर्धी एनर्जी फ्रेमलाच जात होती. मग फाउंडेशनला ते व्हायब्रेशन जात होते आणि फौंडेशन फार भक्कम नसल्यामुळे पूर्ण CATAPULT व्हायब्रेट होऊन अपेक्षित अचूकता येत नव्हती. पण इतका विचार त्यावेळी फर्स्ट इअरला करणे मला तरी शक्यच नव्हते.
                       मी काही सरांचं बोलणं मनावर घेतलंच नाही. अजून एक टेस्ट करून बघू  म्हणून CATAPULT वर्कशॉपच्या बाहेर आणला. मुलांबरोबर चर्चा करत सर बाहेरच उभे होते. निलेशने जोर लावून आर्म ताणला आणि सोडला. 'धाड'असा आवाज आला. जिथे बोल्ट होते,नेमकं तिथूनच आर्म तुटला. आवाजाने सरांची नजर गेली. स्मितहास्य देऊन सर निघून गेले. आत्ता माझ्या डोक्यात सरांनी ते प्रश्न का विचारले वगैरे याची ट्यूब पेटायला लागली. मी आपलं थक्क होऊन पाठमोऱ्या सरांच्या आकृतीकडे आणि आर्मचे झालेले दोन तुकडे हातात घेऊन "आता काय करायचं?" या अविर्भावात माझ्याकडे पाहणाऱ्या निलेशकडे आळीपाळीने पाहत होतो. मी बनवलेलं मूर्तिमंत चुकीचं डिझाईन माझ्या डोळ्यासमोर होतं. सरांच्या प्रश्नांनी आणि त्या घटनेने डिझाईन कसं असावं, यापेक्षा ते कसं नसावं हे मात्र मला चांगलंच कळालं होतं.
ते कोण सर होते हे जाणून घायची उत्सुकता मात्र वाटली. मी प्रफुल्ल दादाला हाक मारली आणि त्याकडे गेलो.
"कोण होते रे ते ?"
"स्टाफ ऍडव्हायझर आहेत MESA-MESC चे"
"आपल्याला शिकवायला असतात का ?"
"हो...बहुतेक MOM शिकवायला असतील तुम्हाला पुढच्या वर्षी "
"जोरात वाटले रे एकदम.. "
"IIT BOMBAY-M.Tech."
इतकाच परिचय मला बास होता.
"नाव काय ?"
"परांजपे सर .... "
आणि माझी सरांशी पहिली भेट अशी नाट्यमय पद्धतीने झाली.
                     त्यानंतर द्वितीय वर्षात मेकॅनिकलचे कोअर विषय आले आणि मेकँनिक्स ऑफ मटेरियल शिकवायला परांजपे सर आले. फर्स्ट इयरमधे असताना सव्वादहाच्या लेक्चरला अगदी साडेदहापर्यंत जाणारे आम्ही आळशी लोक सेकंड इयरला (पहाटे !!) आठला मात्र वेळेत हजर असायचो. वालचंदमधे लेक्चरच्या बाबतीत वक्तशीरपणा पाळणाऱ्या अतिशय कमी माणसांमधे सर एक आहेत असं मला वाटतं. कधी कधी लेक्चर उशिरा आलेल्या मुलांना कारणांसाठी विचारणा व्हायची आणि मग "चप्पल तुटलेली,कॅल्क्युलेटर राहिलेला,पाऊस पडला,गजर वाजला नाही"वगैरे मुलांनी सांगितलेली ती कारणे आणि त्यावरचे विनोद ऐकून आमची हसून हसून पुरेवाट व्हायची. मात्र वेळेत लेक्चरला उपस्थितीत राहण्याच्या नियमापेक्षाही त्यांचं उत्तम शिकवणं विद्यार्थ्यांना वेळेत वर्गात यायला कारणीभूत होतं हे नक्की. लेक्चरला जाताना सरळ समोर तळहातावर नोट्सची फाईल किंवा लागलंच तर एखादं पुस्तक ठेऊन विचार करत, झपझप पाऊले टाकत चालणारे सर मुलांनी फार वेळा पाहीले आहेत.
                     MOM  नंतर ADVANCED SOM,TOM 2,MD 2,FEM असे विषय शिकवायला सर प्रत्येक सेमिस्टरला आम्हाला होते.लेक्चर साठी बसताना पहिले बेंचेस मोकळे सोडायचे नाहीत यासाठी सरांचा आग्रह असतो,मात्र वर्गात कुठेही बसलं तरी त्यांच्या खणखणीत आवाजामुळे लेक्चर अगदी व्यवस्थित ऐकू येतं. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठा आवाज पाहिजेच असा आग्रह धरत त्यांनी कितीतरी वेळा विद्यार्थ्यांना होईल तितक्या मोठ्या आवाजात पुन्हा बोलायला सांगत वर्गात हशा पिकवला आहे. विनोदबुद्धी,रोजच्या आयुष्यातली उदाहरणे आणि प्रश्नोत्तरे यामुळें सरांची विषय हाताळणी नेहमीच इंटरेस्टिंग होते. त्यातही बऱ्याचदा एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने तो सोडवत असतानाच सरांचे बोल ऐकायला मिळतात. TATA मधे R&D त काम करताना किंवा एखाद्या इव्हेंटच्या वेळी आलेले अनुभव,समस्या,किस्से ,टेक्निकल अडचणी व त्यावर केलेली मात वगैरे म्हणजे पर्वणीच..वर्गात मुलांच्या उत्तरावर शाबासकी देताना 'FANTASTIC' हा त्यांच्या परवलीचा शब्द आहे. "LET'S MAKE THE PROBLEM A BIT MORE COMPLICATED" असं म्हणत सर प्रश्नाच्या कठीणाईची एक एक पायरी चढवत जातात (आमच्या कपाळावर आठ्या चढतात त्या वेगळ्या ).'अभ्यासें प्रकटावे'असं समर्थ का म्हणतात याची प्रचिती मला सरांकडे पाहताना आली.IN-SEMESTER EVALUATION साठी टेस्ट,असाईनमेंट सोडूनही काहीतरी वेगळं चॅलेंज द्यायची सरांना सवय आहे.एकदा तर वर्गातील फार दिवस बंद असलेला फॅन सुरु करायला सरांनी सांगितलं होतं आणि मग लेक्चर झाल्यावर काठया घेऊन मुलं फॅन फिरवत बसलेली होती.
                    आकृत्यांमधे वर्तुळ काढताना कंपासचा वापर न करता हातानेच अगदी व्यवस्थित वर्तुळ यायला पाहिजे असं सांगत एकदा त्यांनी राजा रवी वर्माची गोष्ट आम्हाला सांगितली. मीहि तसा प्रयत्न केला;पण ग्राफिक्सला पट्टी घेऊनही सरळ रेषा न मारू शकणारा मी अजूनही वर्तुळ म्हणून आडवं-तिडवं अंडं काढतो. मुलांच्या शंका व्यवस्थितपणे सोडवणारे फार कमी शिक्षक बघितले मी इंजिनीरिंगला. त्यात सर एक. त्यामुळे मग विषयातला आणि लेक्चर मधला इंटरेस्ट हिरमोड न होता शेवटपर्यंत टिकून राहतो.
                    BAJA,EFFI-CYCLE अशा  इव्हेंट्स साठी सर अनेक वर्षे मार्गदर्शन करत आहेत. निश्चितच त्या इव्हेंट्स करणाऱ्या प्रत्येकासाठीच ते अविस्मरणीय दिवस असतात. BAJA च्या निमित्ताने एक शिक्षक सोडून मार्गदर्शक,अगदी मित्र म्हणूनही सरांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू आम्ही सर्वानीच अनुभवला आहे. सरांकडे   एखादा प्रॉब्लेम घेऊन चर्चा करायला गेल्यावर आम्हाला लक्षात यायचं कि त्यांनी आधीच त्यावर विचार करून तो कसा सोडवायचा याचीही तयारी केलेली असते. कदाचित त्यामागे त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव असावा. पण त्यांच्याइतका दूरदृष्टीकोन मला फार क्वचित पाहायला मिळाला हे नमूद करायला हरकत नसावी.
                    प्रसंगी स्वतः पुढे होऊन काम करणाऱ्या सरांना बघताना,त्यांच्याकडून शिकताना,त्यांचं विद्यार्थ्यांबरोबरच बॉण्डिंग पाहताना वॉलचंद मधे  या इव्हेंट्स दिवसेंदिवस का लोकप्रिय होत चालल्या आहेत याचं एक ठाम कारणही मिळतं. 'ह्युमन इंजिनिरिंग ' हा सरांच्या आवडीचा प्रकार;म्हणजे टेक्निकल कौशल्यांबरोबर माणसं सांभाळण्याचं कौशल्य कसं असावं याची प्रचिती मला BAJA करताना आली. ट्रेझरर म्हणूनही काम बघताना लागणार्या पैशांचा अंदाज घेणे,अगदी व्यवस्थित कॉलेजचे बिल पास करणे हा सोपा वाटला तरी प्रसंगी नाकी नऊ आणणारा प्रकार सरांच्या नियोजनाने अगदी सोपा होतो. BAJA साठी इंदोर ला जाताना ट्रेन मधे मूलांना त्रास झाल्यामुळे काही लोकांबरोबर जोरात भांडणाऱ्या सरांना पाहून माझी तरी पाचावर धारण बसली होती. इतके छान शिक्षक असतानाही डिझाईन अवॉर्ड फार कमी गुणांसाठी हुकल्याची खंत मात्र नेहमी राहील. BAJA,EFFI-CYCLE झाल्यावर येताना ट्रेन मधे सरांबरोबर मारलेल्या गप्पा हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय अनुभव राहतो असं मला तरी वाटतं. त्यांची अशा इव्हेंट्स साठीची धडपड पाहून द्रोणाचार्य अवॉर्ड त्यांना मिळावा यात  विशेष वाटत नाही,आम्ही मात्र त्यांच्या इतकी मेहनत घेऊन एकलव्य कधी व्हायचो...देव जाणे !!
                  इव्हेंट्स मुळे सर्वच मुलांशी अगदी छान मैत्री,चर्चा,विनोद झाले तरी मित्र,मार्गदर्शक म्हणून केबिन मधे असणारे सर आणि शिक्षक म्हणून वर्गात असणारे सर हा फरक त्यांनी नेहमीच अगदी काटेकोरपणे पाळला आहे. त्या अनुषंगाने मला ते फार तत्वनिष्ठ वाटतात.
               पण काही विद्यांर्थ्यांमध्ये कदाचित त्यांना आलेल्या अनुभवामुळे असेल;विरुद्ध अंगाने,मतभेद म्हणून सरांविरुद्ध थोडे वाद,विवाद प्रतिवाद आहेत. मुळात तो काही विषय नाही आणि त्याबद्दल मत व्यक्त करण्याची माझी काही पात्रता नाही. पण माझं तरी असं ठाम मत आहे कि "विलक्षण बुद्दीमत्तेपायी थोडीशी जास्त तत्वनिष्ठता असतेच ,मग अगदी सर्वच बाबतीत का असेना.काहींना ती पटते काहींना ती पटत नाही इतकंच."
              काहीही असो पण वालचंद मधे आयुष्यातील ऐन मोक्याच्या वळणावर थोड्या निराशेच्या गर्तेत अडकलेल्या आणि  शैक्षणिक वाटा चुकलेल्या माझ्यासारख्या अनेक मुलांसाठी ज्ञानाचा आणि आशेचा नवा किरण दाखवत सर नेहमीच दीपस्तंभ म्हणून राहतील यात शंका नाही. त्यामुळे वालचंदच्या माझ्या आठवणीत परांजपे सर हे अगदी घट्ट बसणारे समीकरण झाले आहे हे मात्र नक्की .... 

Comments

Madhura Joshi said…
A FANTASTIC article on a FANTASTIC teacher...
भारी लिखाण✌👌
काही माणसं आयुष्यभर मनात घर करून राहतात...सर त्यातील एक...सरांचे क्लासरूम मधील धडे तर आपल्यासाठी precious असतातच...बरोबरीने सरांकडून जीवनाचे धडे सुद्धा (आमच्या नकळत पण सर जाणूनबूजून रूजवत असतात) शिकायला मिळतात...'साधी राहणी उच्च विचार' याला साजेशी मूर्ती...आपल्या विषयातील बाप knowledge... अनुकरणीय जीवनशैली...चेहर्यावर लखलखीत तेज...आमचे अहोभाग्य की आम्हाला सरांचा सहवास मिळाला...
'वी आर satisfied इन वाँलचंद' परांजपे सरांमुळे वाटायला लागलं...इथे आलो नसतो तर एका 'देवमाणसाच्या' सहवासाला मुकले असतो...
Amey Kumbhar said…
सरांना कधी मला भेटता आलं नाही पण तुझ्या लेखणीमुळे मला ते मीच अनुभवतोय की काय, असे वाटले...
बाकी सर्व नेहमीप्रमाणे सुंदरच, अप्रतिम...
प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येवोत हीच गजानन चरणी प्रार्थना...

Popular posts from this blog